चंदिगढ: प्रेयसीशी लग्न करण्याच्या हट्टापोटी एका १८ वर्षीय मुलाने आपल्याच पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना चंदिगढमध्ये घडली आहे. हत्येनंतर या आरोपी मुलाने आईचाही गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र आईने धाडसाने स्वतःचा जीव वाचवला. याप्रकरणी पोलिसांनी १८ वर्षांच्या आरोपी मुलाला अटक केली आहे.
नितीन सिंह (वय ४५) असे मृत हेड कॉन्स्टेबलचे नाव असून ते चंदिगढ पोलीस मुख्यालयातील अकाऊंट्स विभागात कार्यरत होते. चंदिगढ येथील सेक्टर २२ मधील त्यांच्या सरकारी निवासस्थानी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरण्यात आलेले एक गावठी पिस्तूल जप्त केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलीस अधिकारी सुदेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा अरमान (वय १८) याला त्याच्या प्रेयसीशी तातडीने लग्न करायचे होते. त्यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून आपल्या आई-वडिलांवर सातत्याने दबाव टाकत होता. प्रेयसीला घरी आणण्यासाठी आणि लग्नासाठी तो हट्टाला पेटला होता. भारतात मुलाच्या लग्नासाठी कायदेशीर वय किमान २१ वर्षे असणे आवश्यक आहे. त्यामुळे, तुझे वय २१ वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच फक्त ३ वर्षे थांब, त्यानंतर आम्ही तुझे लग्न लावून देऊ, असे सांगत नितीन सिंह आणि त्यांच्या पत्नीने अरमानची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अरमान तात्काळ लग्नाच्या मागणीवर ठाम होता.
वाद, १० लाखांची मागणी अन् आईवर प्राणघातक हल्ला
गुरुवारी संध्याकाळी या विषयावरून घरात पुन्हा मोठा वाद झाला. अरमान लग्नासाठी वडिलांकडे १० लाख रुपयांची मागणी करत होता, तसेच त्याच्या इतर गरजांसाठीही तो सातत्याने पैशांचा तगादा लावत होता. वाद विकोपाला गेल्यानंतर अरमानने घरात असलेल्या गावठी पिस्तूल काढून थेट वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली. वडिलांची हत्या केल्यानंतर नराधम अरमानने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आपल्या आईचाही गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईने कसाबसा त्याच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवला आणि छताच्या (टेरेसच्या) दिशेने धाव घेतली. तिथून त्यांनी आरडाओरडा करून शेजार्यांना घटनेची माहिती दिली.
बाहेरील व्यक्तीने मारल्याचा बनाव अन् चेहर्यावर नाही पश्चाताप
घटनेनंतर चतुर अरमानने घराबाहेरील अज्ञात व्यक्तीने आत शिरून वडिलांवर गोळीबार केल्याचे नाटक रचण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याचा हा बनाव उघडा पडला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. एवढी भयंकर घटना घडवून आणल्यानंतर आणि स्वतःच्या वडिलांचा जीव घेतल्यानंतरही आरोपी अरमानच्या चेहर्यावर कसलाही पश्चाताप दिसत नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अपघातात दोन भावांचा घेतला होता बळी; जामिनावर होता बाहेर
तपासादरम्यान आरोपी अरमानबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मनिमांजरा येथे आपल्या मित्राची महिंद्रे थार गाडी चालवताना त्याने एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुहेरी हत्याप्रकरणी अरमानला अटक झाली होती आणि सध्या तो न्यायालयाकडून मिळालेल्या जामिनावर बाहेर आला होता.
जामिनावर बाहेर आल्यानंतर काहीच दिवसांत त्याने हे दुसरे भयंकर कृत्य केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या चंदिगढ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.